‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – प्रा. डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथिल करून आरोग्य सेवेत कायम सामावून घेण्याच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करून त्यांचे प्रश्न लवकरच सोडविण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी काल मुंबई येथे दिली.
डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत एनएचएम कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य विभागाचे आयुक्त तथा अभियान संचालक धीरज कुमार, विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आरोग्य सेवेत कायम सामावून घेण्याच्या मागणीसाठी एनएचएम अंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील शहरी, ग्रामीण भागातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक पार पडली. यावेळी डॉ. सावंत यांनी एनएचएम कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. याविषयी पाठपुरावा करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू, असे त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले.
: Office of Tanajirao Sawant




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा